सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा- अँटोनियो गुटेरेस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा परिषदेच्या प्रलंबित सुधारणांची प्रक्रिया पुढे जाण्याची आशा राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. परिषदेच्या नव्या स्थायी सदस्यत्वाची आता गांभीर्यानं दखल घेतली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परिषदेच्या 5 स्थायी सदस्यांपैकी 4 सदस्य हे नवे स्थायी सदस्य घेण्याच्या बाजूने असल्याचं त्यांनी नमूद केलं.

भारत अनेक दशकांपासून परिषदेतील रखडलेल्या सुधारणांसाठी दबाव आणत असून आपल्या स्थायी सदस्यत्वासाठी प्रयत्नशील आहे. रशिया,अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांनी भारताच्या  स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिला आहे. स्थायी सदस्य चीन मात्र या सुधारणांच्या विरोधात आहे. 

भारताने अध्यक्ष या नात्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांच्या मुद्द्यावर परिषदेची मंत्रिस्तरीय बैठक नुकतीच आयोजित केली होती.दुसर्‍या महायुद्धानंतर गेल्या 75 वर्षांत नाट्यमयरीत्या  बदललेल्या भौगोलिक-राजकीय परिस्थितीत परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाच्या मूलभूत रचनेवर;या बैठकीत प्रकाश टाकण्यात आला.काही घटकांचा  विरोध वगळता या बैठकीला जगभरातून व्यापक पाठिंबा मिळाला.