जळगावात मुक्ताईनगर तालुक्यात टेकडीची खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल - राधाकृष्ण विखे पाटील

 


मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात टेकडी ची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती अर्थात एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली.

याप्रकरणी मंदाताई खडसे जबाबदार असल्याचा आरोप आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केला होता. येत्या पंधरा जानेवारी पर्यंत राज्याचे वाळू उत्खननासाठी सर्वंकष धोरण आणलं जाईल,असंही विखे पाटील यांनी सांगितलं. याबाबतची लक्षवेधी संजय गायकवाड यांनी उपस्थित केली होती.

ग्रामपंचायतींनी गावठाण विस्तारसाठी मागितलेल्या जागेत शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना जागा दिल्या जातील असंही महसूल मंत्र्यांनी दत्ता भरणे यांच्या लक्षवेधी ला उत्तर देतांना सांगितलं, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील देवगिरी साखर कारखान्याच्या जागेत झालेल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्तांमार्फत एका महिन्यात चौकशी केली जाईल तसेच सदर जागा सपाट करून शेती योग्य केली केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हरिभाऊ बागडे यांच्या लक्षवेधी वर केली .अशी बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि साखर कारखान्याच्या संचालकांकडून दंड वसूली करण्यात येईल असेही विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एम आय डी सी स्थापन करण्याची अधिसूचना हे अधिवेशन संपण्यापूर्वी जारी करण्यात येईल आणि भू संपादन करण्याची कारवाई करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.रोहित पवार यांच्या लक्षवेधी वर ते उत्तर देत होते. सहाशे वीस हेक्टर क्षेत्रावर ही एम आय डी सी होणं अपेक्षित आहे.