G-२० अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं आज झालेल्या G-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-२० अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. भारताकडे G२० च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले. ते म्हणाले की, भारत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये G२० परिषदेच्या बैठका आयोजित करेल आणि G२० ला जागतिक बदलासाठी प्रोत्साहन दिलं जाईल, G२० धोरणामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य असायला हवं यावरही त्यांनी भर दिला. पुढच्या वर्षी ही परिषद भारतात होणार आहे. दरम्यान, परिषदेच्या तिसऱ्या सत्रात डिजिटल परिवर्तन या विषयावर नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले. देशात सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढीवर त्यांनी भर दिला.

जी - ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात विकासासाठी डेटा हा महत्वाचा विषय असेल, असं त्यांनी सांगितलं. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा गरिबीविरुद्धच्या लढ्यात महत्त्वाचा घटक बनू शकतो, तसंच हवामान बदलाविरूद्धच्या लढाईत देखील उपयुक्त ठरू शकतो, असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियात बाली इथं खारफुटी जंगलांना भेट देऊन खारफुटी वनस्पतींचं वृक्षारोपण केलं. G-२० देशांच्या शिखर परिषदेसाठी जमलेल्या जागतिक नेत्यांनी आज तमन हुतान राया नुग्रा राई या कांदळवनाला भेट दिली. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनात खारफुटींच महत्त्व समजून घेऊन भारतानं मॅन्ग्रोव्ह अलायन्स फॉर क्लायमेट या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारात इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिरातींनी पुढाकार घेतला आहे. भारतात खारफुटीच्या ५० हून जास्त प्रजातींनी समृद्ध अशी कांदळवनं सुमारे पाच हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरली आहेत.