सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान निषेधार्ह असून केंद्रानं हस्तक्षेप करुन त्यांना आवरावं अशी अजित पवार यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत बेजबाबदार, प्रक्षोभक वक्तव्यं करणं निषेधार्ह असून हे महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. 

जत आणि अक्कलकोट तालुक्यातल्या गावांवरचा दावा त्यांच्यासाठी 'खयाली पुलाव' ठरेल. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातली ८१४ मराठीभाषक गावं महाराष्ट्रात येणं हा  खरा मुद्दा आहे. ही गावं महाराष्ट्रात आल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार आहे. या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीनं लढेल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपाचे असून त्यांनी अशी वक्तव्यं तात्काळ थांबवावीत, केंद्र सरकारनं याप्रकरणात लक्ष घालून त्यांना आवरावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.