राज्यात सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीचा उत्साह

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपसून  दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवालयांमध्ये टिपूर पाजळले गेले. पालघर जिल्ह्यात केळवे इथल्या शितळादेवी मंदिरात आणि परिसरात काल रात्री 5 हजार दिवे लावले होते. रात्रीच्यावेळी ही सुंदर रोषणाई पाहण्यासाठी मंदिरात नागरिकांनी गर्दी केली होती. 

कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर आज पहाटे दीपोत्सव पार पडला.  घाट परिसरात दिवे उजळवण्याच्या या जुन्या परंपरेला गेल्या दहा वर्षांमध्ये लोकोत्सवाचं स्वरुप आलं आहे. या निमित्तानं अनेक कलाकार आपले कलागुण प्रदर्शित करतात.  कोरोनाच्या बंधनातून मुक्त झाल्यावर होत असलेल्या यंदाच्या दिपोत्सवात घाटावर एक्कावन्न हजार पणत्या लावण्यात आल्या होत्या.  घाटावरच्या पणत्यांचं मनमोहक दृष्य, नाविन्यपूर्ण लेजर शो आणि विद्युत रोषणाईने उजळून निघालेली घाटावरची पुरातन मंदिरं हे बघण्यासाठी आज पहाटे हजारो कोल्हापूरकरांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. कोल्हापूरच्या दीपोत्सवात रांगोळ्यांचीही सजावट असते. विविध लोककला, परंपरा, सामाजिक प्रश्न आणि कोल्हापूरची खासियत अशा विषयांवर विलोभनीय रांगोळ्या यावर्षी बघायला मिळाल्या.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे एक  महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून दोनदा होणारा देवीचा किरणोत्सव सोहळा.  अंबाबाई मंदिरातला सूर्याच्या दक्षिणायनातील किरणोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. मंदिरात किरणोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्या ५५३ व्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध ठिकाणच्या गुरूद्वारांमध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूद्वारात जाऊन गुरूनानक देव यांना नमन केलं. मुंबईत सकाळपासून विविध ठिकाणच्या गुरुद्वारांमध्येही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  त्यात भजन, कीर्तनं, कथा, व्याख्यान सुरु असून महिला आणि मुलांसाठी सत्संगाचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच भाविकांसाठी लंगरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड काळानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा होत असल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. अंधेरी, बोरिवली, मालाड, चेंबूर, खार, दादर, भायखळा, विक्रोळी आदी ६० पेक्षा अधिक गुरुद्वारांमध्ये सकाळपासून भाविक दर्शनासाठी येत आहेत. शहरातल्या विविध गुरुद्वारांतर्फे प्रभात फेरी काढण्यात आली होती.

वाशिम शहरात आज पहाटे गुरुनानकजी देव यांच्या प्रतिमेची  मिरवणूक काढण्यात आली. गुरू नानकदेवजी दक्षिणेला प्रवासाला निघाले असता  इसवी सन 1567 साली ते वाशिम मार्गे बिदरला गेल्याचा उल्लेख बिदर संस्थानच्या नानकझिरा या धार्मिक ग्रंथामध्ये मिळतो. त्यामुळे वशिम शहरातल्या  गुरुनानक मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. या मंदिरात पहाटे पासून पूजा -अर्चना सुरू आहे. तसेच महाप्रसाद वाटप होत आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाड इथल्या प्रसिद्ध गुरुद्वारात बंदरे आणि खनिकर्म विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे  यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला. कोरोना काळात गुरुद्वाराच्या माध्यमातून अन्नछत्र आणि इतर सहाय्यकारी उपक्रम राबवल्याबद्दल भुसे यांनी प्रशंसा केली. गुरुद्वारा परिसराचा विकास आणि इतर समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन भुसे यांनी यावेळी दिलं.