नवी दिल्लीत भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या चर्चेची पाचवी फेरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अझरबैझान यांच्यातल्या परराष्ट्र कार्यालय चर्चेची पाचवी फेरी नवी दिल्ली इथं झाली. दोन्ही देशांमधल्या राजकीय, व्यापार आणि आर्थिक वाणिज्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्यांवर उभय पक्षी संबधांचा व्यापक आढावा यावेळी घेण्यात आला. प्रादेशिक मुद्यांवर तसंच संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुराष्ट्रीय संस्थांमधल्या सहकार्याबाबत विचारांचं आदानप्रदान यावेळी झालं. यंदा भारत आणि अझरबैझान उभय पक्षी राजनैतिक नात्याचं ३० वं वर्ष साजरं करत आहे. १९९१ मधे अझरबैझानच्या स्वातंत्र्याला मान्यता देणाऱ्या प्रारंभीच्या देशांमधे भारताचा समावेश होता. दोन्ही देशांनी व्यापार, वाणिज्य, उर्जा, इत्यादी विविध क्षेत्रांमधलं सहकार्य यशस्वीरित्या पुढं नेलं आहे. दोन्ही देशांमधला व्यापार अनेक पटींनी वाढून आज घडीला  तो सुमारे १ अब्ज डॉलर्सवर पोचला आहे. अझरबैझान हा भारतासाठी कच्च्या तेलाचा महत्त्वाचा पुरवठादार म्हणून पुढं येत आहे.