जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला. त्यात हा अंदाज वर्तवण्यात आला. लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचणं हे मानवी यशाचं लक्षण असलं तरी ही लोकसंख्या भविष्यासाठी एक मोठा धोका आहे असं मत संयुक्त राष्ट्र संघाच्या लोकसंख्या विभागाचे संचालक जॉन विल्मोथ यांनी व्यक्त केलं. जागतिक लोकसंख्येचा अंदाज अहवाल २०२२ नुसार, २०२३ मध्ये भारत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीनला देखील मागे टाकण्याचा अंदाज आहे.  १९५० नंतर जागतिक लोकसंख्या सर्वात कमी वेगानं वाढत आहे, २०२० मध्ये ती एक टक्क्यांहून कमी झाली आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या काही राष्ट्रांमध्ये लोकांच्या दीर्घ आयुष्यामुळं आणि वेगवान वाढीमुळं हा आकडा आला आहे, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. युनायटेड नेशन्सच्या ताज्या अंदाजानुसार २०३० मध्ये जागतिक लोकसंख्या सुमारे ८ अब्ज ५० लाख, २०५० मध्ये ९ अब्ज ७० लाख आणि २१०० मध्ये १० अब्ज ४० लाख इतकी वाढू शकते.