भौगोलिक स्थिती हे आव्हान असूनही मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भौगोलिक स्थिती हे विकासपुढलं गंभीर आव्हान असलं, तरी मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं सर्वच क्षेत्रांमध्ये, विशेषतः मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम  कामगिरी  केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.  त्या आज मिझोराम विधानसभेला संबोधित करताना बोलत होत्या. गावातले रस्ते, महामार्ग आणि पुलांच्या विकासनं केवळ शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेला सहाय्य  मिळत नसून, या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतात असं त्या यावेळी म्हणाल्या. एक आदिवासी बहुल राज्य असल्यानं  मिझोराम राज्य आपल्या भूतकाळामधून प्रशासनाचं काम शिकू शकतं आणि त्याला आधुनिक व्यवस्थेमध्ये पुनरुज्जीवित करू शकतं असं त्या म्हणाल्या. 

मिझोराम विधानसभेचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याचा उल्लेख करत त्या म्हणाल्या कि या विधानसभेनं चर्चेचं एक नवं मॉडेल विकसित केलं आहे, ज्यामध्ये लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रभावीपणे चर्चा केली जाते. मिझोराम मधल्या महिला खेळ, संस्कृती आणि व्यवसायासह जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये पूर्णपणे सक्षम असल्याचं त्या म्हणाल्या. राष्ट्रपती आज दुपारी सिक्कीमच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर राजधानी गंगटोक इथं पोहोचतील. यावेळी त्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील.