ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी २ च्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक म्हणून डॉ. कोत्तापल्ले यांचं मराठी ग्रामीण साहित्यात मोठं योगदान आहे. 'राजधानी', 'वारसा', 'सावित्रीचा निर्णय' या त्यांच्या दीर्घकथा प्रसिद्ध आहेत. 'गांधारीचे डोळे', 'मध्यरात्र', 'पराभव' या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. महात्मा फुले यांच्या जीवनावरचा डॉ. कोत्तापल्ले यांचा 'ज्योतीपर्व' हा ग्रंथ त्यांच्या सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांची साक्ष देतो. मराठीच्या पदव्युत्तर परीक्षेत ते तत्कालीन मराठवाडा विद्यापीठात सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते.

बीड आणि त्यानंतर ते औरंगाबादला विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर, १९९३च्या सुमाराला ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. तिथं विभागप्रमुख असताना त्यांची औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाली. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी 'कमवा आणि शिका' ही योजना बळकट करताना विद्यार्थ्यांचं मानधन वाढवलं. त्यांच्या निर्णयाचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला. कॉपीमुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपीमुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेलं पत्र फार प्रभावी ठरलं.

नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, तसंच साहित्य क्षेत्रातल्या, वीणा गवाणकर, आसाराम लोमटे, दासू वैद्य, यांच्यासह अनेकांनी दु:ख व्यक्त करत, त्यांना आदरांजली वाहिली आहे.