महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यानं, तिथल्या ४० ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडनवीस यांनी, या गावांनी हा ठराव २०१२ सालीच केला होता, असं सांगितलं. महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन महत्वाचे निर्णय घेतले, त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं हे विधान आल्याचं, फडनवीस म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा  सरकारचा विचार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.