भारतानं न्यूझीलंड विरुद्धची २० षटकांच्या क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडविरुद्धची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं एक शून्यने जिंकली आहे. मालिकेतला आजचा तिसरा सामना पावसामुळे अर्ध्यातच सोडून देत पंचांनी अनिर्णित ठरवला. आजचा सामना पावसामुळे उशीरा सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने चार षटकांत १७ धावा देत चार गडी बाद केले. अर्शदीप सिंहने चार षटकांत ३७ धावा देत चार बळी घेतले, तर हर्षल पटेलने एक बळी घेतला. १९ षटकं आणि चार चेंडूत न्यूझीलंडचा संघ १६० धावांत सर्वबाद झाला. या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतीय संघाची सुरुवातही अडखळत झाली.

सलामीवीर इशान किशन, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव हे अनुक्रमे १०, ११ आणि तेरा धावा काढून बाद झाले. श्रेयस अय्यर शून्यावर तंबूत परतला. पावसामुळे नवव्या षटकानंतर खेळ थांबला तेव्हा कर्णधार हार्दिक पंड्या ३० तर दीपक हुडा नऊ धावांवर खेळत होते. मालिकेतला पहिला सामनाही पावसामुळे होऊ शकला नव्हता. दुसरा सामना जिंकल्यानं, भारतीय संघ मालिकेत विजयी ठरला. मोहम्मद सिराज सामनावीर तर दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी करणारा सूर्यकुमार यादव मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दरम्यान, शुक्रवारपासून दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.