पुण्यामध्ये आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार- पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

 

पुणे : पुण्यामध्ये ५ एकर क्षेत्रामध्ये इथल्या आर्थिक व्यवस्थेला दिशा देणारे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरच्या सभागृहात आयोजित मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स एज्यु फेस्ट -२०२२ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक डॉ.प्रशांत गिरबने, सीओईपीचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पवार, भारत अगरवाल आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित एज्यु फेस्ट -२०२२ शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणारा कार्यक्रम आहे. नवीन शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमूख, कौशल्य विकास, गरजेप्रमाणे देण्यात येणारे शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. यासोबत संस्कृती, तत्वज्ञान आणि विज्ञानाला स्थान देण्यात आले आहे. यापुढे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकसित करणारे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांना परवानगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या समन्वयाने शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील कामाची माहिती दिली पाहिजे. त्यांना रोजच्या जीवनात उपयोगी पडणारे शिक्षण द्यायला हवे, असेही पालकमंत्री म्हणाले.

श्री. गिरबने म्हणाले, पुणे हे शिक्षणाबरोबर औद्योगिकदृष्ट्या महत्वाचे केंद्र आहे. एज्यु फेस्ट -२०२२ या कार्यक्रमात सुमारे २१ कंपन्यांनी सहभाग घेतला. शैक्षणिक संस्थानी वेगवेगळ्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांची सहल आयोजित करावी, असे आवाहन त्यांनी केले.