देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. भारतीय राज्यघटना खुली, भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द आहे. तिचा आत्मा युवाकेंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.  ते आज संविधान दिनानिमित्त नवी दिल्ली इथं सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राज्यघटना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तरुणांनी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदी यांनी केलं. देशातील सर्वांसाठी न्यायसुलभता सुनिश्चित करण्यासाठी न्यायपालिका ई-इनिशिएटिव्हसह अनेक पावलं उचलत असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केलं.

मोदी पुढे म्हणाले की, आजच्या जागतिक परिस्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर आहेत आणि वेगाने होत असलेल्या विकासादरम्यान देशाची जागतिक प्रतिमा मजबूत होत आहे. भारत एका आठवड्याच्या कालावधीत G२० चं अध्यक्षपद स्वीकारेल आणि लोकशाहीची जननी म्हणून देशाची प्रतिमा मजबूत होईल याची खात्री करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.  या प्रसंगी त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्र्यांनी ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना माहिती आणि तंत्रज्ञानाद्वारे सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं.

संविधान दिनानिमित्त आज राज्यभर अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते. सोलापुरात पार्क चौक इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून आणि संविधान उद्देशिकेचं वाचन केल्यावर करून फेरीची सुरवात करण्यात आली. 

सामाजिक न्याय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला पाहिजे असं शंभरकर यांनी सांगितलं. कोणीही यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचवल्या गेल्या पाहिजेत, असं ते यावेळी म्हणाले. 

औरंगाबाद महानगरपालिकेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. परभणी शहरात राजगोपालचारी उद्यानातून संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं.