प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या ४५ ठिकाणी, दूरदृश्य प्रणालीद्वारे, नव्यानं भरती झालेल्या ७१ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. प्रधानमंत्र्यांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल लाँच केलं. हे मॉड्यूल सर्व नवीन नियुक्त्यांसाठी एक ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, नैतिकता, सत्यनिष्ठा आणि मनुष्यबळासंबंधीच्या धोरणांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.

मॉड्यूलद्वारे, नियुक्त केलेल्यांना त्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता वाढवण्यासाठी igotkarmayogi.gov.in प्लॅटफॉर्मवर इतर अभ्यासक्रम एक्सप्लोर करण्याची संधी मिळेल. सरकार, नोकऱ्या देण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत असून, विविध राज्यांमध्ये अनेक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहे ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार आहे,  असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. युवाशक्तीची प्रतिभा आणि ऊर्जा वापरण्यास सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असं ते म्हणाले.

जगभरातले तज्ञ भारताच्या विकासाच्या वाटचालीबद्दल आशावादी असून, भारताजवळ जगातील उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. या दिशेनं कुशल मनुष्यबळ महत्त्वाची भूमिका बजावेल, यावर त्यांनी भर दिला. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम, मेक इन इंडिया, लोकल फॉर ग्लोबल, स्टार्टअप्स, ड्रोन आणि स्पेस सेक्टरमध्ये तरुणांसाठी अनेक नवीन रोजगार संधी निर्माण करण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी सांगितलं.