कळपामध्ये चारणे व सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पाजणे टाळण्यासाठी गोपालकांमध्ये जागृती करावी – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

 


मुंबई: गोधनास कळपाने चरण्यासाठी आणि सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पाजण्यासाठी नेण्याच्या गावांमधील दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोगाच्या प्रादुर्भावास कारणीभूत असल्याचे मत राज्यस्तरीय कृतीदलाने व्यक्त केले आहे. या दोन्ही पद्धती लम्पी चर्मरोग नियंत्रणात येईपर्यंत बंद ठेवण्याबाबत गोपालकांमध्ये जागृती करावी. तसेच लसीकरण न झालेल्या गोवंशीय पशुधनाचे लसीकरण करावे, अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिल्या.

क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृती दलासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

श्री.सिंह म्हणाले, लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी “माझा गोठा- स्वच्छ गोठा” अभियान प्रभावीपणे राबवावे. गोपालकांनी नमूद केलेल्या अद्यापही लसीकरण न झालेल्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारित केलेल्या दिवशी लसीकरण करून घ्यावे.

राज्यामधील लम्पी चर्मरोगाविषयी 15 नोव्हेंबरअखेरची अद्ययावत स्थिती

राज्यात 15 नोव्हेंबर 2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3 हजार 560 संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 2 लाख 52 हजार 644 बाधित पशुधनापैकी एकूण 1 लाख 79 हजार 465 पशुधन उपचाराने बरे झालेले आहेत. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 16 हजार 902 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या 6 हजार 255 पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी 16.15 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लाख लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.87 लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सुमारे 98.53 टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले आहे.