शेती पंपाचं चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न तोडण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महावितरणला निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचं चालू बिल भरलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांची विज जोडणी कापल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यासंबंधी सूचना केली.

वीज बिल न भरल्यानं वसुली सुरु असते, मात्र अतिवृष्टीमुळे यंदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांना सूट द्यावी असे आदेश दिले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही, त्यांनी नियमित वीज भरणा करावा, नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. शेतकऱ्यांच्या शेती पंपांचं कनेक्शन तोडू नका, असं त्यांनी सांगितलं.