प्रधानमंत्री १७ व्या जी २० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, तसंच डिजीटल परिवर्तन पुनरुज्जीवीत करण्यावर सर्व प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली जाईल, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. इंडोनेशियातल्या बाली इथं होणाऱ्या या परिषदेसाठी ते आज रवाना झाले. त्यावेळी ते बोलत होते.  या परिषदेच्या सांगता समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला सुपुर्द करतील. पुढच्या महिन्यापासून भारत जी-20 परिषदेचा अध्यक्ष असेल, असंही त्यांनी सांगितलं. पुढच्या परिषदेसाठी ते सर्व सदस्य देशाच्या प्रमुखांना  वैयक्तिकरित्या आमंत्रण देतील, असं ते म्हणाले. सध्या जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी भारतातर्फे केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांबद्दल अन्य देशांना अवगत केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं. वसुधैव कुटुंबकम, एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुढच्या परिषदेची संकल्पना असेल. जे समान विकास आणि सगळ्यांसाठी समान भविष्य या संदेशाला अधोरेखित करत आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्या भारतीय समुदायाला संबोधीत करण्यासाठी ते फार उत्सुक असल्याचं म्हणाले