पंतप्रधान उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या दौऱ्यावर

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवस कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते २५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन रेल्वेला बंगळुरूमधल्या केएसआर रेल्वे स्थानकावर ते हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी, पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं १० हजार ५०० कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन,पायाभरणी आणि लोकार्पण करतील. तेलंगणामधील रामागुंडम इथं पंतप्रधान मोदी नऊ हजार ५०० कोटींहून अधिक रक्कमेच्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील. तामिळनाडूमधल्या गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या ३६ व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत.