आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत - राहुल गांधी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोदमध्ये आदिवासी कष्टकरी महिला मेळाव्यात ते बोलत होते. आदिवासी हे देशाचे मालक आहेत. पण त्यांचे मालकी हक्क मिळू नयेत, ते आदिवासी नाहीत, तर कायम जंगलातच रहावेत, म्हणून त्यांना वनवासी संबोधून त्यांची खरी ओळख पुसण्याचं काम भाजपा करत आहे. काँग्रेसनं आदिवासींसाठी पेसा कायदा, वन हक्क कायदा दिला. तो तुमचा अधिकारच आहे.

कारण या जमिनीवर पहिलं पाऊल आदिवासींनी टाकलं. पण प्रधानंत्री आदिवासींसाठी वनवासी हा शब्द वापरतात. वनवासी म्हणजे जंगलमध्ये राहणारा म्हणजेच शहरात राहू न शकणारा, शिक्षण न मिळू शकणारा. जंगल संपलं तर तुमचं अस्तित्वही संपेल. तुमच्या अस्तित्वावर घाला घातला जात आहे, असं राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसनं महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण देऊन राजकारणात महिलांना प्रतिनिधित्व दिलं. महिला, आदिवासी, दलित, वंचित समाज घटकाला न्याय देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं त्यंनी सांगितलं.

या मेळाव्याला मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री खा. दिग्विजयसिंह, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, योगेंद्र यादव आदी मान्यवर उपस्थित होते. ही भारत जोडो यात्रा आज बुलडाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेशाकडे रवाना होणार होती, त्यानुसार जिल्हात आणि राज्यातही आज या यात्रेचा शेवटचा दिवस होता. मात्र राहुल गांधी जळगाव जामोदहून प्रचारासाठी गुजरातला जात असल्यानं जिल्ह्यात यात्रेचा मुक्काम २ दिवस वाढला आहे. यात्रेला दोन दिवस विश्रांती असल्याचं काँग्रेस सूत्रांनी सांगितलं.