शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. माधवराव मोरे यांनी १९८०-८१ च्या काळात शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांच्या सोबतीनं संघटनेची स्थापना करून ती रुजवण्याचं काम केलं. या संघटनेच्या माध्यमातून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, कृषिमूल्य आयोग बरखास्त करावा तसेच ‘कांद्याला मंदी तर ऊसाला बंदी’ अशा मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारलं होतं. द्राक्ष निर्यात करणारी कंपनी त्यांनी सुरू केली. निफाड तालुक्यात विंचूर इथं शासनातर्फे वायनरी पार्क उभारण्यात त्यांचं मोठे योगदान होतं.  १९९२ मध्ये त्यांनी महाग्रेपची स्थापना केली. पुढे महाग्रेप हे द्राक्ष उत्पादकांचे व्यासपीठ ठरलं. नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मोरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मोरे यांच्या निधनानं देशातल्या कष्टकरी चळवळीचा आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त केली आहे.