नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात शक्य होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि औरंगाबाद दरम्यान प्रस्तावित नव्या द्रुतगती मार्गामुळे नागपूर ते पुणे हे अंतर केवळ आठ तासात गाठणं शक्य होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. हा प्रस्तावित मार्ग हरीत द्रुतगती मार्ग असेल आणि तो समृद्धी महामार्गावर औरंगाबादला जोडला जोडला जाईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं हा मार्ग बांधला जाईल असं गडकरी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या मार्गावरून पुणे आणि औरंगाबादमधलं अंतर सव्वा दोन तासात, तर औरंगाबाद आणि नागपूरमधलं अंतर साडेपाच तासात गाठणं शक्य होईल असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

हा नवा मार्ग १२८ किलोमीटरचा असेल, यापैकी ३९ किलो मीटरचा मार्ग पुणे शहराभोवतीचा रिंग रोड असेल. यावर एकूण ८ मार्गिका असतील. राज्यातल्या अहमदनगर, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतून हा मार्ग जाईल. या नव्या मार्गामुळे पुणे बंगळूरू द्रुतगती मार्गावरून गोवा तसंच बंगळूरूसह कर्नाटकातले काही जिल्हे पुणे, औरंगाबाद आणि नागपूरला जोडले जातील, आणि त्यापुढे ते मध्यप्रदेश आणि उत्तर भारतालाही जोडले जातील अशी माहिती गडकरी यांनी आपल्या संदेशात दिली आहे.