वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
• महेश आनंदा लोंढे
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. वनपाल वरवंड यांना १८ ऑक्टोबर रोजी भ्रमणध्वनीवरून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी वरवंडचे वनपाल व वनरक्षक यांना पाहणी करण्यास पाठवले. नाना धर्मा सावंत हे आपल्या घराच्या परिसरात मांसाचे तुकडे करताना दिसून आल्याने दोघांनी त्यांचेकडे याबाबत विचारणा केली. त्यांच्या शेजारीच घमेल्यामध्ये कासवाच्या तोंडाचा तुकडा दिसून आला व शेजारी भिंतीच्या पलीकडे कासवाचे कवच दिसून आले.
याबाबत वनपाल व वनरक्षकांनी यांनी सावंत यांचेकडे अधिकची चौकशी केली असता हे कासव दादा नाना सावंत यांनी भाजून खाण्यासाठी घरी आणल्याचे सांगितले. कासव हा वन्यप्राणी भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या परिशिष्ठ १ च्या भाग-२ मधील वन्यप्राणी असल्याने दादा नाना सावंत, नाना धर्मा सावंत, भिमराव रामभाउ सावंत आणि शंकर दत्तू सावंत यांचेवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ च्या कलम २, ९, ४४ ख आणि ५१ अन्वये वनगुन्हा नोंदवून त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यांना २५ ऑक्टोबरपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटीलयांनी आदेश दिले असून या प्रकरणी सहायक वनसंरक्षक दिपक पवार आणि वनपरिक्षेत्र अधिकारीकल्याणी गोडसे हे अधिक तपास करीत आहेत.
भारतीय वन्यजीव अधिनियमातील तरतुदींनुसार वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर ३ ते ७ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद असून कोणीही वन्यप्राण्याची शिकार करू नये अथवा त्यांचे जिवाशी खेळू नये. नागरिकांना कुठेही वन्यप्राण्याची शिकार करताना एखादी व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ वनविभागाच्या हेल्पलाईन क्र.१९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन उपवनसंरक्षक श्री.पाटील यांनी केले आहे
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.