‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती

 

पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली कामगिरी केली असून २१ सप्टेंबर हा दिवस ‘महा सेवा दिन’ म्हणून साजरा करत या एकाच दिवशी २६ हजार ५२९ सेवा पुरवण्यात आल्या आहेत.

सेवा पंधरवडा कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबतच्या नवीन शासन निर्णयानुसार २३ हजार २६० शेतकऱ्यांना मदत निधीचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) साठी स्वयंनोंदणी केलेल्या १५ हजार पैकी १४ हजार ७९० शेतकऱ्यांच्या पात्र-अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ९ हजार ७७६ प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करण्यात आला असून १६ अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे (अपील वगळून) मंजूर करण्यात आली आहेत.

उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत (नॉन क्रिमी लेयर) १हजार ६ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्रे-४९, मालमत्ता हस्तांतरण नोंद -४७६, नव्याने नळ जोडणी-१२२, मालमत्ता कराची आकारणी व मागणी पत्र देणे-६ हजार ७०० आणि आपले सरकार/ पीजी पोर्टल तक्रार निवारण पोर्टलवर आलेल्या ३ हजार ९८१ अर्जांची निर्गती करण्यासोबतच यासह २ हजार ७७१ पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.

याशिवाय सेवा पंधरवड्यामध्ये सेतू सुविधा केंद्रांमध्ये प्राप्त २६ हजार ३७६ अर्जांपैकी २३ हजार ४९३ अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे. ‘पीएम-किसान’ योजनेमध्ये जिल्ह्यातील ४ लाख ९० हजार पात्र लाभार्थी असून युद्धपातळीवर काम करत त्यापैकी ४ लाख ४० हजार लाभार्थ्यांची शेतजमिनविषयक माहिती (लॅण्ड रेकॉर्ड्स) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अपलोड केली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची माहितीही गतीने अपलोड करणे सुरू आहे. योजनेसाठी पात्र असलेल्यांपैकी ३ लाख ९५ हजार शेतकऱ्यांची आधारजोडणी करण्यात आली असून उर्वरित कामाला वेग देण्यात आला आहे.

सेवा पंधरवडा कालावधीमध्ये २१ सप्टेंबर हा दिवस जिल्ह्यात ‘महा सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या एकाच दिवशी २६ हजार ५२९ सेवा पुरवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महसूल विभागाच्या १४ हजार ९८१ सेवा पुरवण्यात आल्या तर महसूल विभागामार्फत ७ हजार ४३ लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती लाभ वितरण करण्यात आले. पोलीस विभाग, महावितरण, मनपा, नगर प्रशासन, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभाग यांच्याकडून एकूण ४ हजार ५०५ सेवा देण्यात आल्या.

तालुका स्तरावर पुणे-शहर, पिंपरी-चिंचवड, आंबेगाव, बारामती, भोर, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, शिरुर, वेल्हे तहसीलदार कार्यालयांमार्फत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत ७० हजार पशुधनाचे लसीकरण करण्यात आले.

आता प्रत्येक महिन्याला ‘महा सेवा दिन’
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दर महिन्यात घेण्यात येणाऱ्या फेरफार अदालतीमध्येदेखील अशाप्रकारे ‘महा सेवा दिन’ साजरा करण्यात येणार असून सर्व विभागांना महाराजस्व अभियानामार्फत समाविष्ट केले जाणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी कळवले आहे.