'' दिवाळी सण फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत '' - पोलीस उपायुक्त मंचक इप्पर

 

''अंध बांधवानी अधिक सतर्क रहात स्वतःची काळजी घ्यावी'' - पोलीस सह. आयुक्त आनंद भोईटे

पिंपरी : ''दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा उत्सव नसून तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत आहे. हा उत्सव सर्वांच्याच घरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, समाजातील अंध बांधवांच्या जीवनात खरा आनंद निर्माण करण्याचे काम साद सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून कामगार नेते इरफान सय्यद गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यांचा अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करीत काम केले जाते, तेव्हा ते उल्लेखनीय होतेच. अंध बांधवांमध्ये मोठी शक्ती असते, त्याचा खुबीने वापर केला तर, ते या जीवनात खूप मोठ्या पदावर जाऊ शकतात. त्यासाठी समाजातील अंध बांधवांनी आपल्यातील कलागुणांना प्रोत्साहन देत, यशस्वीपणे आयुष्य जगावे, ही सदिच्छा व्यक्त करीत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी केले.

साद सोशल फाऊंडेशनने दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी रोजी शहरातील अंध कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली. आकुर्डीतील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सह. आयुक्त आनंद भोईटे यांच्या हस्ते अंध कुटुंबिय अनं बांधवाना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना उपायुक्त मंचक इप्पर बोलत होते.  यावेळी साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस सह. आयुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.रंगनाथ उंद्रे , पोलीस निरीक्षक श्री. खुळे साहेब साद सोशल फाऊंडेशनचे सदस्य आणि सहकारी उपस्थित होते.

पोलिस सह. आयुक्त आनंद भोईटे म्हणाले, गुन्हेगारांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले तर, सरतेशेवटी त्यांना आपल्या चुका लक्षात येतात. त्यातून जीवन जगताना आपण कसे जगावे? याचा मार्ग सुकर होतो. त्यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. शेवटी चांगल्या वाईट अनुभवातूनच मनुष्य घडतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दामिनी मदत कक्ष निर्माण केला आहे. त्यातून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात यश मिळत आहे. अंध बांधवानी देखील अधिक सतर्क रहात स्वतःची काळजी घ्यावी.

प्रास्ताविक साद सोशल फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.महेश शेटे यांनी करून फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर साद सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष इरफानभाई सय्यद म्हणाले, '' गेल्या ८ वर्षांपासून अंध बांधवांसोबत साद सोशल फाउंडेशन दिवाळी उत्सव साजरा करते. मोहननगर येथे केवळ ५ ते १० बांधवांपासून सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाला आज सोहळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आनंदाने सहभागी होतात. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याची संधी आम्हाला ते देतात. समाजातील विविध स्तरातील गरजूंना केलेली मदत हे ख-या अर्थाने समाजऋण फेडण्याचे कार्य आहे. या बांधवांनी दिलेले आशिर्वाद हीच माझी उर्जा आहे. ज्या उर्जेमुळेच मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते. आज खरोखरच माझ्या या अंध बांधवाच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली आहे. अंध कुटुंबियांच्या चेह-यावरील आनंद चिरकाल टिकाविण्यासाठी साद सोशल फाऊंडेशन सतत प्रयत्नशील राहील '', अशी ग्वाही इरफान सय्यद यांनी दिली.