पिंपरी चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

 

पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य, पाणी तसेच नागरिकांच्या मुलभूत गरजांचे नियोजन करावे अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला केल्या.

 पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापालिकेच्या विविध विकास कामांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार उमाताई खापरे, महेश लांडगे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, शहर अभियंता मकरंद निकम, यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग देऊन शहरातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामे लवकरात लवकर  करावीत. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून पाणीपुरवठा सुरळीत करावा. गृहनिर्माण संस्थांचा ओला कचरा न उचलण्याच्या निर्णयाला महापालिकेने स्थगिती द्यावी, असे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेच्या शाळांमध्ये पट संख्या वाढण्यासाठी महापालिकेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत आणि गुणवत्तावाढीवर भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांबद्दल जिज्ञासा निर्माण करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात यावे. महापालिकेच्या यशस्वी शाळांची नोंद घेऊन त्यांना अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन द्यावे. शैक्षणिक पायाभूत सुविधांची उपलब्धता अधिक प्रमाणात करून द्यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महापालिकेच्या विविध विभागामार्फत सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण तसेच प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या संलग्न असलेल्या मेट्रो, पीएमआरडीए विकासात्मक प्रकल्पाबाबत राज्य तसेच केंद्र शासनाकडे प्रलंबित अथवा विचारार्थ असलेल्या प्रश्नांची माहिती त्यांना दिली. त्याबाबत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.  
तत्पूर्वी, महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान अभियानांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकेचा ताबा प्रमाणपत्र देण्यात आले.