शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शारदीय नवरात्रौत्सवाला आज प्रारंभ झाला. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभप्रसंगी सर्वांचं जीवन ऊर्जा आणि आनंदानं भरुन जावं, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगत जननी देवीची कृपा आपल्यावर सतत राहो, आणि आपल्या जीवनात सुख शांती, समृद्धी आणि आरोग्याचा वास होवो, असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, शारदीय नवरात्रोत्सवाकडून राज्याच्या सर्वांगीण विकास, आणि समृद्धीसाठी व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया, अशा शब्दांत नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी मूर्तीला पंचामृताचा महाभिषेक करण्यात आला. पहाटे चार वाजता मंदिर संस्थानचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक तुळजापुरात दाखल झाले आहोत. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी देवीच्या अलंकारांची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विश्वस्त मंडळाच्या वतीनं महापूजा करण्यात आली आणि महाआरतीनंतर भाविकांसाठी हे मंदिर खुल झालं. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या नूतनीकरणामुळे सुमारे दोन महिन्यांपासून देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद होतं, ते आजपासून खुलं झाल्यानं पहिल्या माळेपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली आहे. दरम्यान, गर्दीचं नियोजन प्रशासनानं केलं असून खाजगी वाहनांना गडावर जायला मनाई केली आहे. राज्य परिवहन महामंडळानं दररोज अडीचशे जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. सातारा जिल्ह्यात किल्ले प्रतापगडावर भवानी माता मंदिरात, औंध इथं यमाई, किन्हई इथं साखरगड निवासिनी तसंच मांढरदेव इथं काळूबाई मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.