स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीनं १७ ए प्रकल्पातल्या तारागिरी या तिसऱ्या लढाऊ नौकेचं आज जलावतरण केलं. ही नौका ३ हजार ५१० टन वजनाची असून तीचा प्रारुप आराखडा भारतीय नौदलाच्या तंत्रज्ञांनीच तयार केला आहे. १४९ मिटर लांबीच्या या युद्धनौकेची रुंदी जवळजवळ १८ मिटर आहे. यामध्ये दोन गॅस टर्बाईन आणि २ मुख्य डिझेल इंजिन असून तीचा कमाल वेग ताशी २८ समुद्री मैल होऊ शकतो. विकेंद्रित पद्धतीनं या जहाजाची बांधणी केली आहे. या जहाजाचे विविध भाग देशातल्या विविध ठिकाणी तयार करुन नंतर ते एकत्र जुळवले आहेत. ही युद्धनौका ऑगस्ट २०२५ मध्ये भारतीय नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे. या युद्धनौकेवर विविध आयुधं त्याचप्रमाणे अत्याधुनिक संपर्क यंत्रणा बसवल्या जाणार आहेत. शत्रूच्या हल्ला करणाऱ्या विमानांचा आणि इतर जहाजांचाही अचूक वेध घेणारी यंत्रणा या युद्धनौकेवर असेल.