एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ या वर्षासाठी १० कोटी ६९ लाख ५६ हजार रुपये इतक्या रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी ४८ लाख ३६ हजार रुपये इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला असून उर्वरित ७ कोटी २१ लाख २० हजार रुपये शिल्लक आहेत.

या कृती आराखड्यानुसार प्रामुख्याने संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह, शेडनेट हाऊस व प्लॉस्टीक मल्चिंग, सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ उभारणी तसेच क्षेत्र विस्तार कार्यक्रमांतर्गत ड्रॅगनफ्रुट, निशीगंध, मिरची, हळद, आले आदी फळे, फुले, मसाला लागवड तसेच आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

तरी या घटकांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी कळवले आहे.