गावांमध्ये आरोग्य सुधारावे यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा - गुलाबराव पाटील

 


मुंबई (वृत्तसंस्था) : गावांमध्ये कायम स्वच्छता राहावी, ग्रामस्थांचं आरोग्य सुधारावे यासाठी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचं महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतला तर गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज "स्वच्छता के लिए एकजुट भारत' मोहिमेअंतर्गत ऑनलाईन सरपंच संवाद कार्यक्रमात बोलत होते. गावातल्या कचराकुंडया आणि असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, सुका आणि ओला कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत, कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचं व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या दुष्परिणामांबद्दल सभा घ्याव्यात, पाणवठ्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण, इत्यादी विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी राज्यातल्या प्रत्येक तालुका पंचायत समिती कार्यालयातून संबधित तालुक्यातल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, तसंच पंचायत समितीचे पदाधिकारी, आणि सरकारी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते