राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार - उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात दिली. आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या 231व्या जयंती निमित्त पुरंदर तालुक्यातील भिवडी इथे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपयांची तसंच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.

रामोशी आणि इतर भटक्या आणि विमुक्त जातींमधील नागरिकांना यापुढे जातीच्या दाखल्यासाठी अडचणी येणार नाहीत अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.दरम्यान, आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त काल मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनीही मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवी दिल्ली इथल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आलं.