पुण्यातल्या ग्रामीण भागातला लम्पी त्वचा रोगाचा वाढता प्रसार पाहता गुरांचे बाजार आणि वाहतुकीवर बंदी

 

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनावरांमध्ये लंम्पि त्वचा रोगाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्ह्यातील गुरांचे बाजार आणि गुरांच्या वाहतुकीवर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याबद्दलचा आदेश जारी केला असून त्यानुसार, गुरांचा सहभाग असलेला कोणताही कार्यक्रम घेण्यासही मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत लंम्पी त्वचा आजाराची जी प्रकरणे आढळून आली त्यापैकी बहुतेक बाधित जनावरे परराज्यातून आली होती किंवा परराज्यातून आलेल्या गुरांच्या संपर्कात आलेली होती, असं निरीक्षणही नोंदवण्यात आलं आहे. लंम्पी त्वचा रोगाचा प्रसार टाळण्यासाठी बाधित भागात ३० हुन अधिक फिरते पशुवैद्यकीय दवाखाने तैनात करण्यात आले आहेत, याशिवाय वाढीव डॉक्टर आणि औषधांचा पुरवठा सुद्धा करण्यात येत आहे.