विद्यार्थ्यांमधली गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेत मातृभाषेतले शिक्षण महत्त्वाचे - द्रौपदी मुर्मू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृभाषेतील शिक्षण हा विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा टप्पा आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतल्या शिक्षणामुळं विज्ञान, साहित्य, सामाजिक शास्त्र या विषयांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना अधिक गती येतं असंही त्यांनी सांगितलं.

शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शालेय विषय शिकवत नाही तर त्यांना आयुष्यातल्या आव्हानांचं सामना कसा करायचा हे देखील शिकवतात, असंही त्या म्हणाल्या. नवी दिल्लीत शिक्षक दिनी देशातल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त ४६ शिक्षकांच्या सत्कारानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि बीड मधल्याच पारगाव जोगेश्वरी इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईतल्या छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता संघवी यांनाही राष्ट्रपतींनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलं.