पॅकिंग असलेल्या साहित्यावरच जीएसटी आकाराला जातो- राज्यमंत्री भागवत कराड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नाशिक मध्ये अखिल भारतीय महानुभाव पंथियांच्या संमेलनात बोलत होते.

सुटं तेल विकण्यावर निर्बंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात महागाई वाढली असली तरी अमेरिका आणि चीनच्या तुलनेत ती कमी असल्याचं ते म्हणाले. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन वेळा कमी केल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महानुभाव संमेलनाच्या समारोप समारंभात बोलतांना कराड यांनी, श्री चक्रधर स्वामींचं गुजरातमधल्या भडोच इथं असलेलं जन्मस्थान सर्वांसाठी खुल व्हावं यासाठी आपण स्वतः गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सांगितलं.