दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे - नाना पटोले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातली सत्ताधारी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळेल, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. गेल्या सात-आठ वर्षात भाजपा नेते विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी, कारवायांच्या धमक्या देत असतात. मात्र महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत, जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, असं त्यांनी सांगितलं.

वैनगंगा नदीच्या कोपामुळे भंडारा जिल्ह्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे. शिवारात पाणी साचल्यानं धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी, लाखांदूर, पवनी या तालुक्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. तिथं त्वरित मदत पोहोचवावी अशी मागणी पटोले यांनी विधानसभेत केली. अतिवृष्टीमुळे राज्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली भागात पाणी साचलं आहे, घरे पडली आहेत, शेती उद्धवस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे, यावर सरकारला निवेदन करण्याचे आदेश द्यावेत, असं ते म्हणाले.