महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या असून त्या सर्वांच्या हिताच्याच आहेत, असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं.

या विधेयकात सुधारणा करताना परतावा भरण्यासंदर्भातील सुधारणांवर भर देण्यात आला आहे; तसंच इंधन दरवाढ होऊ नये, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून त्याबाबतचे निर्णय घेत आहे, असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामाबाबत राज्यव्यापी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत दिली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.