रक्तदान तसेच आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

 

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला.

क्रांतिवीर उमाजी नाईक हुतात्मा स्मारक येथे पुणे शहर तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ३०० पेक्षा अधिक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये साखर, रक्तदाब, डोळे तपासणी, त्वचा विकार, कान, नाक घास, दंत तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तहसीलदार राधिका हावळ- बारटक्के यांनी संयोजन केले.

पुणे शहर तहसील कार्यालय, हवेली तहसील कार्यालय, संजय गांधी निराधार योजना पुणे व हवेली कार्यालय, नगर भूमापन कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी यांनी रक्तदान केले. रक्तदान तसेच तपासणी शिबिरासाठी ससून रुग्णालय व जिल्हा रुग्णालय, औध येथील वैद्यकीय पथक उपस्थित होते.