मेट्रो ३’ प्रकल्प या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पार पडली

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूरक ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चाचणीसाठी मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. या चाचणीअंतर्गत मेट्रो गाडीनं सारिपूत ते मरोळ असा प्रवास केला. येत्या सहा महिन्यात या मार्गावरच्या चाचण्या वेगानं पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

हा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या वाहतुक कोंडीवरचा रामबाण उपाय आहे. आता या प्रकल्पात कोणतंही विघ्न येणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्याच्या विकासकामात कोणीही अडथळे आणू नयेत असं आवाहनही त्यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावर खाजगी वाहतूक कमी होणार असल्याने सुमारे २ लाख ३० टन कार्बन उत्सर्जन कमी होईल.