'घरोघरी तिरंगा' उपक्रम मनात देशगौरवाची भावना निर्माण करणारा - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

 

राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

पुणे : 'घरोघरी तिरंगा' उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात देशप्रेमाची, देशगौरवाची भावना निर्माण होईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या शुरवीरांचे कार्य तरूण पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवत देशाप्रति अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी 'घरोघरी तिरंगा' उप्रकमात सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

'घरोघरी तिरंगा' अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय पंचायतराज आणि सांस्कृतिक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था येथे आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिक सन्मान सोहळ्याप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. यावेळी पंचायतराज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजय कुमार बेहरा, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे संचालक प्रा. डॉ. के. सत्या लक्ष्मी, उपविभागीय अधिकारी संजय आसवले आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यादरम्यान महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान येथे १५६ दिवस वास्तव्य असल्याने ही वास्तू स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे. निरोगी पिढी घडविण्यासाठी निसर्गोपचाराला महत्व असल्याचा संदेश गांधीजींनी दिला होता. त्यांचा स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आणि देशातील गावांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची योगदिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याची संकल्पना संपूर्ण जगाने स्विकारली आहे. आज १९७ देशात योगदिवस साजरा केला जात आहे, हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रध्वजासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलीदान दिले त्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा मिळण्यासाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा ठरणार आहे, असे मंत्री पाटील म्हणाले.

पंचायतराज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजय कुमार बेहरा यांनी 'घरोघरी तिरंगा' उपक्रमांचे आयोजनाबाबत माहिती दिली.

उपविभागीय अधिकारी श्री आसवले म्हणाले, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि नंतर देशाच्या संरक्षणासाठी स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक, सीमेवरील सैनिक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानासह ‘घरोघरी तिरंगा’ अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल.

श्रीमती सत्या लक्ष्मी, यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेबाबत माहिती दिली. बापू भवन या ऐतिहासिक वास्तूत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (एनआईएन) या संस्थेची डॉ. दिनशॉ मेहता यांनी स्थापना केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संस्थेला भेटी दिल्या आहेत. त्यांनी या संस्थेत काही दिवस मुक्कामदेखील केला आहे असे त्यांनी सांगितले

मंत्री श्री.पाटील हस्ते स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय व युद्धात वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.