राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. नऊ सुवर्ण, आठ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं मिळवून एकूण २६ पदकांसह पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर आहे.

या स्पर्धेत काल कुस्तीमध्ये भारताने ६ पदकं जिंकली. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांनी सुवर्णपदक जिंकलं, तर अंशू मलिकने रौप्य पदक जिंकलं. दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल यांनी कांस्यपदक पटकावलं.

महिला हॉकीमध्ये मात्र उपांत्य फेरीत भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.  लॉन बॉल्समध्ये पुरुषांच्या  गटात भारतीय संघाने  इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतानं टेबल टेनिसच्या महिला एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे.