भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात, अर्ध्या टक्क्यानी वाढ केली. रेपो रेट ४ पूर्णांक ९ दशांशावरुन ५ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात चार महिन्यात १ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांची वाढ केली आहे. स्थायी सुविधा दर ४ पूर्णांक ६५ शतांश टक्क्यांवरून ५ पूर्णांक १५ शतांश टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी मौद्रिक नीती समितीच्या आप्तकालीन द्विमासिक बैठकीत रेपो दराच्या वाढीची घोषणा केली.

दास म्हणाले की, २०२२-२३ मधे आर्थिक विकास वाढीचा दर ७ पूर्णांक २ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी रिझर्व्ह बँकेच्या मौद्रित स्थिती धोरणाबाबत बोलताना सांगितलं की, आरबीआयचा  रेपो दर वाढीचा निर्णय संतुलित आणि विवेकपूर्ण आहे. यामुळे तरलता कायम राहिली असून, आरबीआयचा सध्याचा आर्थिक विकास वाढीचा अपेक्षित ७ पूर्णांक २ दशांश टक्के दर निर्णय जो जागतिक बाजारातल्या अस्थिर परिस्थिती, मंदीची भीती आणि युक्रेन युद्धाचा परिणाम लक्षात घेता अत्यंत सुदृढ आहे. हा निर्णय व्यवसाय आणि ग्राहकांसाठी न्यायपूर्ण असून, पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपर्यंत महागाई ६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचं आरबीआयचं उद्दिष्टं असल्याचं सिंघानिया यांनी सांगितलं.