पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो भेसळयुक्त गुळ तर ८२ हजार ४४० रुपये किंमतीची २ हजार ७५० किलो भेसळयुक्त साखर जप्त करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे मुदतबाह्य चॉकलेट, भेसळयुक्त गुळ व साखर वापरणाऱ्या गुळ उत्पादकावर कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी २०२२ मध्ये दोन गुळ उत्पादकावर धाडी टाकुन ३ लाख ६७ हजार ९०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार १६२ किलो गुळाचा साठा जप्त करण्यात आला होता. फेब्रुवारी २०२२ मध्ये हातवळण येथील गुळ उत्पादकावर धाडी टाकुन गुळ व भेसळीसाठी वापरली जाणारी साखर जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी घेण्यात आलेले घेण्यात आलेले नमुने असुरक्षित असल्याचे घोषीत करण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. जप्त केलेली साखर नष्ट करण्यात आली आहे.
जुलै २०२२ मध्ये गुऱ्हाळ घरांना भेसळीसाठी पुरविण्यात येणारी ७ लाख ७५ हजार रुपये किंमतीची सुमारे २५ हजार किलो साखर जप्त करण्यात आली आहे.
याबाबत प्रशासनास मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनामार्फत लवकरच विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. याप्रकरणी गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळ चालकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या कायद्याअंतर्गत आवश्यक असलेला परवाना प्राप्त करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.