काँग्रेसची आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसनं आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शनं केली. विधानभवन परिसरात निदर्शनं करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे , वर्षा गायकवाड,  मोहन जोशी, देवानंद पवार, प्रमोद मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यवतमाळ इथं जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी रास्तारोको करून  महागाईच्या भस्मासुराचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.  तर महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल मांडून गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा विरोध केला. जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या  शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण केले नाहीत याबद्दलही कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.

बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगावात काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विरोधात रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन निवेदन दिलं.

उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.कुलदीप उर्फ धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. त्यामुळे शासनानं ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत करावी, पीककर्ज माफ करावे, फळ बागायतदारांना भरीव मदत करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.