देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याची सरकारची लोकसभेत ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री - साध्वी निरंजन ज्योती यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणालीची संपूर्ण देशभरात, २०१३ पासून अंमलबजावणी करण्यात आली असून त्याचा लाभ सुमारे ८१ कोटी ३५ लाख लाभार्थी  घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

गरजूंना माणशी पाच किलो धान्य तसंच अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रति कुटुंब पस्तीस किलो अन्नधान्य द्यायला सरकारचं प्राधान्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नाचा पुरेसा साठा करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात असून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित असल्याचं त्यांनी सांगितलं.