मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध; हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• महेश आनंदा लोंढे
बीड : मराठा समाजाला आरक्षण, सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत, हा दिवंगत विनायक मेटे यांचा ध्यास होता. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी स्व. मेटे यांनी सतत प्रयत्न केले. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी, त्यांच्या उन्नती, प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, हीच दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे दि. 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खा. इम्तियाज जलिल, यांची प्रमुख उपस्थिती होती.
विनायक मेटे यांचे अपघाती निधन ही अविश्वसनीय, मनाला न पटणारी, मनाला चटका लावणारी,अप्रिय, दुःखद, वेदनादायी घटना असल्याचे सांगून श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही माणसं कुटुंबापुरते मर्यादित नसतात, त्यांची समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ असते. मराठा समाज व शिवसंग्राम हा त्यांचा परिवार होता. त्यांचा एकच ध्यास होता तो म्हणजे मराठा समाज आरक्षण सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अरबी समुद्रातील शिवस्मारक यासाठी दिवंगत मेटे यांनी सतत प्रयत्न केले. त्यासाठी जे जे करावं लागेल, ते सरकार करेल हा सरकारचा शब्द आहे. आमचे सरकार मराठा समाजाला नक्की न्याय देईल. दिवंगत मेटे देह रूपाने नसले तरी त्यांचे कार्य, संघर्ष चिरंतन आहे. त्यांच्या जाण्याचं दुःख पचविण्याची शक्ती, ताकद देव त्यांच्या कुटुंबियांना देवो. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे ते म्हणाले.
विनायक मेटे यांचे अपघाती निधन हा आपल्यासाठी दुःखद प्रसंग असून, आज आपल्याला शब्द सुचत नाहीत. ही आपली वैयक्तिक हानी असल्याच्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा समाज, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, अरबी समुद्रातील शिवस्मारक असे एक एक विषय मार्गी लावण्याचा दिवंगत मेटे यांचा प्रयत्न होता. शिवसंग्राममधून त्यांनी सामान्य तरुणाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी जे काम हाती घेतले, ते पूर्ण करण्याचा संकल्प आज करत आहोत, असे सांगून हा प्रसंग सहन करण्याची शक्ती त्यांच्या वैयक्तिक व शिवसंग्राम च्या कुटुंबियांना ईश्वराने द्यावी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे ते म्हणाले.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री सामाजिक अधिकारिता मंत्रालय व असल्याने व महाराष्ट्रातील मराठा व बहुजन समाजाचे प्रश्न आग्रहाने मांडणारा नेता म्हणून माझा मेटेंशी दीर्घ काळापासून संपर्क होता विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिकेला आमचे कायमच पाठिंबा होता या अनुषंगाने त्यांनी मांडलेले प्रश्न साठी पुढच्या काळात नक्कीच कार्य केले जाईल व्हायचा असे ते म्हणाले.
अंत्यसंस्कारास सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अंत्यसंस्कार आ. संजय शिरसाट, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. श्वेता महाले, आ. संदिप क्षीरसागर, आ. संजय दौड, आ. सुमनताई पाटील, आ. रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री पंकजा मुडे, मा. मंत्री अर्जुन खोतकर, मा. राज्यमंत्री सुरेश नवले, माजी खसदार चंद्रकात खैरे, माजी आमदार सदाभाऊ खोत, मा.आ. सैय्यद सलिम, मा.आ. रविकांत तुपकर, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज साठे, रमेश आाडसकर, रमेश पोकळे विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रमुख, समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासाठी देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी व नागरीक आलेले होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी दिवंगत मेटेंच्या पत्नी ज्योतीताई ,कुटुंबिय, आप्त परिवार व मातोश्री यांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांचे समवेत उपस्थित मंत्रिमंडळ सदस्यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्काराचे विधी शोकाकुल वातावरणात, कार्यकर्त्यांच्या घोषणांच्या गजरात झाला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.