सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही- अजित पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीनं झालेलं पिकांचं, घराचं, झालेलं नुकसान प्रचंड असून एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्यामुळे सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नोंदवली आहे.

कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार आणि बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारनं केलं आहे असंही ते म्हणाले.

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ३ हेक्टर क्षेत्राची घातलेली मर्यादा अन्यायकारक असून यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. ही अट अधिक शिथील करण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.