जल पुरवठा, स्वच्छता अभियान आणि जलसुरक्षा कार्यक्रमात देशानं मोठं यश मिळवल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ग्रामीण भागातली  १० कोटी घरं ही पाईपद्वारे केलेल्या जल पुरवठ्यानं जोडले गेले असून देशासाठी हे एक मोठं यश आहे. असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. या योजनेत लवकरच आणखी ३० कोटी घरं जोडली जाणार आहेत असंही ते म्हणाले.

देशानं स्वच्छता आणि जलसुरक्षा क्षेत्रातही मोठं यशं मिळवलं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.  ते आज जलजीवन अभियानांतर्गत गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या हर घर जल उत्सवाला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करतांना बोलत होते. 

हर घर जल चं १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मिळवणारं गोवा हे देशातं पहिलं राज्य ठरलं असल्याबद्दल हा कार्यक्रम होत आहे. जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, मुख्यमंत्री  प्रमोद सावंत उपस्थित होते.  यावेळी पाण्याची बिलं अदा करण्यासाठी क्यूआर कोड प्रणालीचाही प्रारंभ करण्यात येणार आहे.

गोवा हे हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलंआहे, तर दादरा, नगर हवेली आणि दमण आणि दीव हे पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले आहेत. गोवा तसंच दादरा नगर हवेली आणि दमण मधल्या सर्व खेड्यांमधल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करून आपल्या गावातल्या सर्व घरांमध्ये नळाद्वारे पाणी उपलब्ध झाल्याचं अर्थात हर घर जल आल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे गोव्यातल्या सर्व म्हणजे दोन लाख ६३ हजार ग्रामीण कुटुंबांना तर दादरा नगर हवेलीतल्या ८५ हजार कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

कोरोनाच्या साथीमुळं अनेक प्रकारच्या अडचणी आणि आव्हानं उद्भवलेली असतानाही गोवा आणि दादरा नगर हवेलीतले पंचायत सदस्य, पाणी समित्या जिल्ह्यातले आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळं हे यश प्राप्त झालं आहे, असं जलशक्ती मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.