महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या यावरच्या याचिकेत आरोग्य विभागानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असंच नमूद केल्याचं मंत्री म्हणाले, बालक मृत्यूची कारणं वेगळी असून कुपोषण नाही, असं ते म्हणाले.

मंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर चुकीचं उत्तर दिल्यामुळे हक्कभंग आणावा लागेल असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. काल मंत्री पुरेसे उत्तर देऊ न शकल्यानं हा प्रश्न राखून ठेवला होता. प्रश्नोत्तराच्या वेळी शाब्दिक चकमक झाल्याने सभागृहात गदारोळ झाला.

मंत्र्यांचं उत्तर अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. विधानपरिषदेत भाजपाच्या गटनेते पदी प्रवीण दरेकर यांची नियुक्ती झाल्याची घोषणा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.