कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर

 

मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डॉ. अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. आज त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने डॉ. पालकर यांच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

डॉ. पालकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन ॲण्ड  लिंकेजेसच्या संचालक पदावर 2018 पासून कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यकाळात पुणे विद्यापीठाने “अटल” या इनोव्हेशनमधील राष्ट्रीय क्रमवारीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आज ४० स्टार्टअप विद्यापीठात सुरू आहेत, तर बाहेरील ३७५ स्टार्टअपसोबत विद्यापीठ काम करत आहे. डॉ. पालकर या अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या माजी विद्यार्थीनी आहेत. त्यांनी व्यवस्थापनशास्त्र विषयात पीएचडी केली आहे. त्यांचा या क्षेत्रात जवळपास २५ वर्षाचा अनुभव आहे. डॉ. पालकर यांना प्रतिष्ठित रवी जे मथाई नॅशनल फेलोशिप पुरस्कार मिळाला आहे.

कौशल्य शिक्षणातील गुणवत्तेची अग्रेसर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला उदयास आणणे, कौशल्यविषयक निपुणता व क्षमता असलेले गुणवत्तापूर्ण युवक विकसित करणे यासाठी कार्य करण्यात येईल. शिक्षण आणि कौशल्य यांच्या प्रगतीचे आणि गतिशीलतेचे मार्ग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षणासह एकात्मिक व सर्वंकषरितीने रोजगार व उद्योजकता यासह कौशल्य शिक्षणाला चालना मिळावी यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे डॉ. पालकर यांनी सांगितले.