अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनादरम्यान रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान

 नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

आंदोलन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सार्वजनिक अव्यवस्थेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. परिणामी काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्या मोबदल्यात प्रवाशांना देण्यात आलेल्या परताव्याच्या रकमेची स्वतंत्र आकडेवारी ठेवली जात नाही.१४ ते ३० जून या कालावधीत फेऱ्या रद्द केल्यामुळे सुमारे १०३ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

पोलीस आणि सार्वजनिक सुव्यवस्था हे राज्याचे विषय आहेत त्यामुळे, रेल्वेमार्गांवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी, गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, गुन्ह्यांचा शोध, नोंदणी आणि तपास करण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित राज्यातील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा जवाबदार आहेत असं वैष्णव यांनी उत्तरात नमूद केलं आहे.