राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील स्मार्ट मीटर बसवण्यात येईल. याशिवाय वीज वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या यांची कामे करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.्

राज्यातल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. अतिउच्चदाब तसंच उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतल्या शेतकऱ्यांना जून २०२१ पासून, एक रुपया १६ पैसे प्रति युनिट तसंच स्थिर आकारामध्ये २५ रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल. लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांना एक रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर आणि स्थिर आकारामध्ये १५ रुपये प्रति महिना सवलत जून २०२१ पासून नव्याने देण्यात येईल. यासाठी दोन्ही अनुदानापोटी महावितरण कंपनीस ३५८ कोटी ९७ लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येईल.